सौ. आशा सुनील माने
मुख्याध्यापक
शाळा म्हणजे उत्तम संस्कार l शाळा म्हणजे ज्ञानाचे भांडार ll गुरु शिष्यांचे माहेरघर आणि विद्येचे मंदिर ll
हे सिद्ध करून दाखवणारी शाळा म्हणजे 'डेक्कन एज्युकेशन सोसायटीची न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळा' होय. स्वातंत्र्यपूर्व काळात विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य बाल गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी अशा देशभक्तांनी एका विशिष्ट ध्यासाने राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी स्थापन केलेल्या या शाळेला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. देशात - विदेशात स्वतःच्या कर्तुत्वाने तेजाने तळपत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी हा इतिहास जपला आहे. आजकालच्या या सिमेंटच्या जगामध्ये सगळीकडे फक्त घरं, दुकानं,कार्यालयच दिसत आहेत. पदपथावर देखील विक्रेते ठाण मांडून बसलेले दिसतात. चार चाकी, दुचाकी गाड्यांनी उरलेली जागा हडप केली आहे. मुलांना खेळण्यासाठी जागाच उरलेली नाही. त्यामुळे मोबाईलवर फुटबॉल, क्रिकेट खेळणाऱ्या मुलांची संख्या वाढत आहे. पण रमणबाग शाळेला मुलांना खेळण्यासाठी खूप मोठं मैदान लाभलेला आहे त्यामुळे मुलं शाळेच्या वेळेत तासाप्रमाणे मैदानावर खेळत असतातच पण सकाळी आणि संध्याकाळी देखील शाळा सुटल्यावर खोखो, हॉकी, फुटबॉल यासारखे खेळ सुरूच असतात.
प्रशस्त वर्ग, मोकळी हवा, भरपूर झाडे, विविध उपक्रमांमध्ये रमलेली मुलं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं ते "इंग्लिश स्कूल रमणबाग" या शाळेमध्ये. शाळा व घरातील संस्कारांच्या शिदोरीवर विद्यार्थी विविध अडचणींवर मात करण्यासाठी तयार होत असतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आवश्यक कौशल्य शालेय वयातच अंगी बाणवली जावीत यासाठी शाला माऊली विविध उपक्रम राबवीत असते. गणित प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, विविध खेळ, नाटक, संगीत,वकृत्व स्पर्धा, पर्यावरण अभ्यास, वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सव, गणेशोत्सवाच्या काळामध्ये ढोल ताशा पथक, सुसज्य ग्रंथालय, एनसीसी, आरएसपी, स्काऊट तसेच व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम, रोबोटिक्स,हार्डवेअर अँड असेम्ब्लींग,थ्रीडी प्रिंटिंग, जर्मन, जापनीज हे परकीय भाषावर्ग, टेराकोटा, बाह्य परीक्षा, संस्कृत भाषा या सर्व गोष्टी शाळेमध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होत आहे. विद्यार्थ्यांना आयुष्यात उपयोगी पडणं अनेक मूल्य शालेय वयातच शिकविली जातात.यासाठी सतत तत्पर असणारे,कृती कार्यक्रमांची अंमलबजावणी करणारी माझे सहकारी पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर, सेवक हे या शाळेचे आधारस्तंभ आहेत. आयुष्यभर जपल्या जाणाऱ्या मैत्रीची सुरुवात होते ती शालेय वयातच. शाळेचा दुसरा आणि महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे माजी विद्यार्थी हा होय. सतत कार्यरत असणाऱ्या माजी विद्यार्थी संघामुळे शाळेमध्ये बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत आणि अजूनही होत आहेत. 'आम्ही कितीही मोठे झालो असलो तरी आम्हाला अजूनही आमची शाळा आठवते' असं सांगणारे माजी विद्यार्थी जेव्हा शाळेत येतात तेव्हा ऊर अभिमानाने भरून येतो.
ही आवडते मज मनापासून शाळा l
जी लाविते लळा जसा माऊली बाळा ll
शाळेच्या विविध समारंभांना, समित्याच्या सभांना उपस्थित असणारे पालक म्हणजे शाळेचा तिसरा आधारस्तंभ होय. शाळेतील विकास कामांसाठी पालकांचे देखील सहकार्य लाभते. या सर्वांचा परिपाक म्हणजे शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमा अंतर्गत मिळालेले तृतीय क्रमांकाचे पारितोषिक तसेच महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे आयोजित शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा बाह्य मूल्यांकनात रमणबाग शाळेला A+ श्रेणी प्राप्त झाली आहे. आयुष्याचे गणित सोडवायला पाठ्यपुस्तकातले गणित कितपत उपयोगी पडेल सांगता येणार नाही.पण ते सोडवायला लागणारी कौशल्ये शालेय वयातच मिळतात. म्हणून मुलांनो इथला प्रत्येक क्षण, प्रत्येक उपक्रम, विविध कार्यक्रम, निरनिराळ्या स्पर्धा यामध्ये तुम्ही हिरीरीने भाग घेतला पाहिजे. याचा उपयोग तुम्हाला तुमच्या भावी जीवनामध्ये नक्कीच होणार आहे. या सर्व उपक्रमांसाठी मौलिक मार्गदर्शन करून नेहमी खंबीरपणे पाठीशी असणाऱ्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद!