माझा मुलगा समर्थ दत्तात्रय मेढेकर अगोदर एका नामांकित इंग्लिश माध्यमाच्या शाळेत सहा वर्ष शिकत होता. परंतु त्याची या कालावधीत अपेक्षित प्रगती झाली नाही. उलट तो नैराश्यतेकडे झुकला होता.
मग त्याला मी पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग या शाळेत इयत्ता पाचवीत प्रवेश घेतला. सध्या तो दहावीच्या वर्गात शिकत आहे. त्याची अभ्यासातील प्रगती खुप उल्लेखनीय आहे. रमणबाग शाळेत अभ्यासासोबतच प्रसंगानुरुप सहशालेय उपक्रम मोठ्या प्रमाणावर घेतले जातात. चांगला माणूस, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भारतीय मन, मनगट व मेंदू असलेला भारतीय नागरिक तयार करण्यासाठी शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक हे सातत्याने परिश्रम घेत असतात.
सध्या इंग्लिश माध्यमातून शिक्षण घेणे ही एक फॅशन झाली आहे. पण माझा वैयक्तिक अनुभव आहे, मातृभाषेतून शिकलेले विद्यार्थी जीवनातील यश-अपयश, चढ-उतार या बाबीला आत्मविश्वासाने सामोरे जातात.इंग्लिश माध्यमातून शिक्षण घेणे हे महत्वाचे नसुन विद्यार्थ्यांना इंग्लिश एक भाषा म्हणून चांगली आली पाहिजे हे निश्चित.पालकानी मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे. न्यू इंग्लिश स्कूल ,रमणबाग या शाळेचे व्यवस्थापन, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक हे मेहनतीने व आत्मियतेने काम करतात.रमणबाग शाळेच्या या पवित्र कार्यास हार्दिक शुभेच्छा...
डेक्कन एज्युकेशन सोसायटीची न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग या शाळेत माझा मुलगा यशवंत चव्हाण हा इयत्ता आठवी येलो या वर्गात शिक्षण घेत असून ही शाळा उपक्रमशील शाळा आहे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून शाळेतील प्रशासन सर्व शिक्षक अतिशय परिश्रम घेत असताना दिसून येतात खऱ्या अर्थाने मुलांना उत्तम नागरिक होता येणं आपल्या कुटुंबाविषयी समाजाविषयी आस्था व प्रेम निर्माण होणे फार आवश्यक आहे व त्या दृष्टिकोनातून ही शाळा त्या प्रकारचे संस्कार देण्याचं कार्य करत आहे शाळेतील शिक्षक अतिशय क्रियाशील असून विद्यार्थ्यांच्या बारीक बारीक गोष्टींच्याकडे लक्ष देऊन त्यांना मार्गदर्शन करत असतात मराठी माध्यमाची ही शाळा खऱ्या अर्थाने एक संस्कारच फार मोठं केंद्र आहे पुणे शहरातील ही शाळा भौतिक सुविधांनी परिपूर्ण व बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार काम करायला सज्ज असणारी अशी ही शाळा आहे शाळेच्या या कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा!
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग ही महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित शाळा आहे. परंपरा आणि गुणवत्ता यासाठी शाळा ओळखली जाते. विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देण्यावर शाळेचा नेहमी प्रयत्न असतो, त्यामुळे शाळेत कडक पण सकारात्मक शिस्तीचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी अतिशय अनुभवी आणि समर्पित शिक्षक आहेत. शिक्षणासोबतच क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रकल्प, विविध स्पर्धा अशा अनेक उपक्रमांवर भर दिला जातो. फक्त पुस्तकी शिक्षण नव्हे तर नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारी निर्माण करण्यासाठी शाळा खूप प्रयत्न करते. न्यू इंग्लिश स्कूल सारख्या नामांकित शाळेमध्ये शिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. केवळ शैक्षणिकदृष्ट्या नव्हे तर मानसिक, सामाजिक आणि भावनिकदृष्ट्याही सक्षम होतात. भविष्यात यशस्वी आणि जबाबदार नागरिक होण्यासाठी अशा शाळांचा मोलाचा वाटा असतो.
( निपुण नवगिरे ८ वी ग्रीन हाऊस)
नमस्कार, आमच्या मुलाचे नाव चिन्मय शशांक मराठे, शैक्षणिक वर्ष 2024 25 मध्ये 15 जून पासून डेक्कन एज्युकेशन सोसायटीची न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग याप्रशालेत चिन्मयला आम्ही प्रवेश घेतला. सुरुवातीपासूनच मराठी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घेतलेल्या चिन्मयला याच शाळेत प्रवेश घेण्याचे आम्ही निश्चित केले होते. कारण चिन्मयचा आत्तेभाऊही या शाळेत चिन्मयच्याच वर्गात शिकत होता. आणि मुख्य ही शाळा मराठी माध्यमाची आहे.
शिक्षणाने विद्यार्थी सज्ञान होतो; पण छंद विद्यार्थ्याला आकार देत असतात, त्यांना घडवत असतात. आता तर शिक्षण कौशल्याभिमुख असेल तर त्याला प्राधान्य दिले जाते. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळा सातत्याने मुलांना त्याची जाणीव करून देत असते.
या शाळेमध्ये शिक्षणासोबतच मुलांमधील अंगभूत कौशल्यांना आकार देण्यासाठी सर्वच शिक्षक तत्परतेने सहकार्य करत असतात. शाळेच्या मुख्याध्यापक चारुता प्रभुदेसाई या स्वतः साहित्यिक वर्तुळात आघाडीच्या साहित्यिक आहेत.
लहान वयात मुलांची आकलन शक्ती आणि कुतूहल अधिक असल्यामुळे जेवढं ज्ञान आपण मुलांना देऊ त्यावर त्यांची जडणघडण अवलंबून असते. त्यांचा कल नेमका कुठे आहे, हेही आपल्याला आजमावणं त्यामुळे शक्य होतं. गरज असते ती ज्ञान उपलब्ध करून देण्याची.
या शाळेतील बहुआयामी तासिका हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण. चारित्र्याचा विकास हेच खरे शिक्षण हे ओळखून ही शाळा सातत्याने विविध उपक्रम राबवत असते.
चिन्मय जरी याच वर्षी या शाळेत आला असला तरीही चिन्मयच्या जडणघडणीत काही महिन्यातच आम्हा दोघांना खूप छान प्रगती दिसून आली. यावर्षी संस्कृत आणि जापनीज हा नवीन विषय चिन्मयला अभ्यासक्रमात होता. तरीही या नवीन विषयातही शिक्षकांच्या साथीने रुची घेत शालेय प्रगती सोबतच चित्रकला, बुद्धिबळ, शैक्षणिक विविध उपक्रम जसे की, सायन्स प्रोजेक्ट, मराठी - इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा यामध्ये ही चिन्मय रमताना आम्हाला जाणवतो आहे. या सर्वांत अर्थातच प्रशालेतील सर्व शिक्षक सातत्याने चिन्मयला प्रोत्साहन देतात. चिन्मयच्या वर्गातील त्याचे सहकारी मित्रही त्याला खूप छान पद्धतीने सांभाळून घेतात.
धन्यवाद
सीमा शशांक मराठे
शशांक श्रीधर मराठे
नमस्कार. मी डॉ. तेजश्री गुरव. माझा मुलगा न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पाचवी (रेड हाऊस मध्ये शिकत आहे. मराठी माध्यमात मुलांना शिकवायचे हे आमचे अगदी सुरुवातीपासून ठरले होते. मग मराठी माध्यमाची उत्कृष्ट शाळा शोधत असताना आम्ही रमणबागेशी जोडलो गेलो. दर्शची तब्ब्येत तशी नाजूक असल्याने माध्यमिक मध्ये त्याचे कसे निभावणार? याची चिंता अगदी पहिल्याच महिन्यात मिटली ती म्हणजे त्याचे वर्गशिक्षक शेंडे सर यांच्यामुळे. शाळेचा प्रत्येक स्टाफ हा मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देत आहे हे अगदी पहिली चाचणी होण्यापूर्वीच लक्षात आले. तसेच गुरसाळे मॅडम, सातपुते सर, अशा अनुभवी शिक्षक आणि चारुता प्रभुदेसाई मॅडम सारख्या उत्तम शालाप्रमुखांच्या देखरेखी खाली आपलं मुल वाढत आहे याचा आम्हाला पालक म्हणून खूप अभिमान वाटतो. अगदी पहिल्या ३-४ महिन्यामध्येच दर्शला परिपाठाच्या ग्रुप मध्ये गाडगीळ सरांमुळे संधी मिळाली. दर्शला शाळेमध्ये भाषण, पोवाडा गायन, बालभारती मधील गायन उपक्रमात सहभागी होता आले. दर्शचा कल ओळखून गुरसाळे मॅडमच्या प्रेमळ स्वभावामुळे त्याला नव्याने इंग्रजी मध्ये असूनही गणित सोपे वाटू लागले आणि त्याची गोडी निर्माण झाली. सातपुते सरांनी दर्शच्या एका नाट्यछटा स्पर्धेसाठी खुप मदत केली तसेच त्यांच्या कृष्णयन या नाटकात त्याला सहभागी करून घेतले. शाळा पाहताना शाळेला मोठे मैदान असावे या मतावर आम्ही ठाम होतो. दिवसातील ७ तास मुले शाळेत असतात. त्यामुळे उत्तम शिक्षणासोबत मुलांना मनसोक्त खेळता येईल आणि शारीरिक वाढ देखील व्यवस्थित होईल हा त्यामागचा हेतू.
पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असूनही रमणबागेचे प्रशस्त मैदान पाहून आम्ही निश्चिंत झालो. आजच्या स्पर्धेच्या काळात रमणबाग तिचा दर्जा टिकवून आहे याचे मनापासून कौतुक.
॥ श्री श्रीधरस्वामी कृपा ॥
आमचा मुलगा चि. प्रत्युष हा न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, पुणे या शाळेत इयत्ता नववीत ऑरेंज हाऊसमध्ये शिकत आहे.
या शाळेचे मा. मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे सर्व मुलांची काळजी आई होवून घेतात याची प्रचिती अनेकदा येते. आपले विद्यार्थी व त्यांचे अंगी असणारे कलागुण याची जाणीव असणारे शिक्षक आम्हाला न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेत लाभले.
या शाळेत चित्रकला, पाठांतर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पाककला स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, गणपती मूर्ती बनवणे स्पर्धा, विज्ञान स्पर्धा अशा विविध स्पर्धेत विद्यार्थी सहभागी होतात. या विविध स्पर्धांमधून चि. प्रत्युषचा मानसिक, शारिरीक, बौद्धिक विकास झालाच, पण यातूनच त्याला धाडस, सभाधीटपणा मिळाला व आत्मविश्वास निर्माण झाला.
शाळेतील मा. रवींद्र सातपुते सरांनी प्रत्युषच्या अंगातील अभिनयाची कला लक्षात घेवून त्याला इयत्ता आठवीत असताना नाटकात भाग घेण्याची संधी दिली. शाळेतील 'आभाळमाया' या स्पर्धेच्या नाटकात ‘पांडबा’ ही व्यक्तिरेखा प्रत्युषने साकारली. ‘पांडबा’ या भूमिकेबद्दल प्रत्युषला अभिनयाकरिता अनेक बक्षिसे मिळाली. महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेच्या ‘आभाळमाया’ या नाटकास प्रथम क्रमांक मिळाला, तर प्रत्युषला अभिनयाचे प्रथम पारितोषिक मिळाले. हे आमच्या आयुष्यातील सुखद क्षण आहेत.
तसेच इयत्ता नववीत असताना न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेच्या ‘माय सुपर हिरो’ या स्पर्धेच्या नाटकासही महाराष्ट्र राज्य बाल नाट्यस्पर्धेत पुणे केंद्रात व संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय पारितोषिक मिळाले. या नाटकातील पेरुवाला व बाबा या भूमिकेसाठी प्रत्युषला पुणे विभागातून व महाराष्ट्र राज्यातून अभिनयाचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
चि. प्रत्युषला मराठी माध्यमाच्या शाळेत घालणे हे आमचे दोघांचे एकमत. खूप पालकांशी व जाणकार व्यक्तींशी चर्चा करून मग डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्या. रानडे बालक मंदीर, नवीन मराठी शाळा व न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग हा प्रत्युषचा शैक्षणिक प्रवास ठरवला गेला. आई-वडील म्हणून हा प्रवास प्रत्युषला घडविण्यासाठी सार्थ झाला.
‘मुलं आहेत, काहीतरी करत राहणार’ असे असले तरी मुलांमुळे आईवडील असल्याचा सार्थ अभिमान आम्हांला शाळेकडून मिळाला, त्याबद्दल आम्ही न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग,पुणे या शाळेचे सदैव ऋणी आहोत.
नमस्कार
मी. सौ. सुप्रिया मयुर किरवे माझा पाल्य. चि.तन्मय मयुर किरवे इ. नववी ग्रीन व चि.तनिष मयुर किरवे इ. सहावी येलो या वर्गात शिकत आहे.मुलांना इंग्रजी माध्यम की मराठी माध्यम च्या शाळेत प्रवेश घ्यावा ह्या बाबत मी पण साशंक होते पण मुलांनी मातृभाषेतून शिक्षण घेतले तर उत्तम या ठाम विचाराने त्यांचे न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग पुणे या शाळेत मराठी मध्यम ( सेमी इंग्लिश) साठी प्रवेश घेतला. या शाळेतील शिस्त, संस्कार , विविध स्पर्धा ,उत्तम शिक्षण पद्धती तसेच सण_ उत्सव दिमाखात साजरे करण्याची पद्धत यामुळे मुले योग्य प्रकारे घडतात.त्याच बरोबर समाजात वावरताना भविष्यात आवश्यक असणारे उच्च विचार व अचूक निर्णय घेण्याची क्षमता रमणबाग शाळेने मुलांना दिली. मुलांना मिळालेल्या शिदोरीचा मुले नक्कीच त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी उपयोग करतील हे नक्की.
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग. ही पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील नामांकित शाळा. गुणवत्तापूर्वक अशी ही शाळा जुनी आहे, परंतु अद्ययावत सर्व अध्ययन - अध्यापन प्रणालीचा या शाळेमध्ये वापर केला जातो. विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी झटणारे हरहुन्नरी शिक्षक गण या शाळेत आहेत. आपली संस्कृती जपण्यासाठी वेगवेगळ्या सणांचे आयोजन केले जाते, प्रत्येक शनिवारी बहुआयामी तासिकेचे आयोजन केले जाते. शिक्षणा सोबतच मुलांचा बौध्दिक, सामाजिक, मानसिक, शारीरिक, व नैतिक विकास होण्यासाठी शाळेत क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रकल्प, विविध स्पर्धा असे अनेक उपक्रम राबविले जातात . आणि यातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. माझा मुलगा गुरुदत्त हा या शाळेत इयत्ता आठवी ग्रीन मध्ये शिकत आहे, रमणबाग शाळेत आमच्या मुलाला नेहमीच सर्व पैलूंचे अन्वेषण आणि प्रगती साधण्यासाठी संधी मिळतात.न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग ही शाळा सर्व क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. अतिशय सुंदर नियोजनबद्ध आणि व्यवस्थित शैक्षणिक कार्यक्रम. सर्व शिक्षकांचे चांगले प्रयत्न. शाळेच्या व्यवस्थेबद्दल आणि शिक्षकांच्या सहकार्य वृत्तीमुळे मी खूप समाधानी आहे.
( गुरुदत्त दडस.८ वी ग्रीन हाऊस )
माझा मुलगा स्वाधीनराजे ,इयत्ता पाचवीत शिकत आहे.
मुलांना मुक्तपणे शिक्षण घेत स्वतःचे छंद जोपासता येतील असे वातावरण असणारी शाळा मी शोधत होते .
मला रमणबाग शाळेबद्दल कळले आणि मी मुलाला त्या शाळेत प्रवेश घेतला.
शाळेत शैक्षणिक वातावरण उत्कृष्ट आहे . मुलांना शिक्षणात गोडी निर्माण होईल अशा पद्धतीने शिकवले जाते.
तसेच मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम राबविले जातात उदा लेखनस्पर्धा , विज्ञानस्पर्धा , नाट्यकला स्पर्धा इ.
यावर्षी स्वाधीनराजेंनी विज्ञानस्पर्धेत उस्फूर्तपणे भाग घेतला व उत्कृष्ट रोबोट कार बनविली. यामागे शाळेतून त्याला मिळालेले प्रोत्साहन कारणीभूत ठरले .
मुलांना शरिरिक विकास साधता यावा यासाठी शाळेला मोठे क्रिडांगण आहे. क्रिडास्पर्धांमधे सहभागी होण्यासाठी मुलांना प्रोत्साहन दिले जाते.
हल्ली इंग्रजी शाळांचे फॅड असतांना मी मुलाला मराठी शाळेत शिक्षण घेत आहे कारण मातृभाषेतून मुले स्वतःला उत्कृष्ट प्रकारे व्यक्त करतात. त्यातही रमणबागेसारखी नावाजलेली शाळा असेल तर सोन्याहुन पिवळे.
येथे जुने जाणते शिक्षक आहेत ज्यांना मुलांबद्दल आपुलकी व प्रेम वाटते. एकदा का मुलाशी जिव्हाळ्याचे संबंध जुळले की त्याला शाळा कुटुंबाप्रमाणे भासू लागते आणि तो शाळेत एकरूप
होतो.
आणखी एक गोष्ट प्रकर्षाने नमुद करावीशी वाटते की , शाळेचे मुख्याध्यापकांना शाळेत राहण्यासाठी निवासाची व्यवस्था आहे. म्हणजेच शाळेत ज्याप्रमाणे सिसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असते तसेच मुख्याध्यापक हे तिसरा डोळा बनून शाळेच्या मुलांवर लक्ष ठेवत असतात.
एकूणच रमणबाग शाळा मुलांना शिकण्यासाठी उत्कृष्ट शाळा आहे. माझा मुलगा या शाळेत शिकतो याबद्दल मला अभिमान आहे.