करूया गणिताशी मैत्री
Posted on March 24, 2025
योगेश पडदुणे
सहाय्यक शिक्षकगणित हा सर्व शास्त्रांचा पाया मानला जातो. गणित जर नसेल तर कोणतेही शास्त्र पूर्ण होऊ शकणार नाही. मग ते भौतिकशास्त्र असो रसायनशास्त्र असो, भूगोल असो, खगोल शास्त्र असो किंवा अगदी जीवशास्त्र असो. एवढेच नव्हे तर संगीतामध्ये सुद्धा आणि कवितेमध्ये सुद्धा गणित आहे.कविता रचताना वेगवेगळ्या मात्रावृत्ताचा विचार करताना त्यात गणिताचाच विचार केला जातो. थोडक्यात काय कोणतेही शास्त्र गणिता शिवाय पुढे जाऊ शकणार नाही. अशा या गणितातील सर्वात महत्त्वाचा आणि उपयुक्त मानला जाणारा शोध म्हणजे π (पाय)ही संकल्पना. वर्तुळाच्या बाबतीत वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी किंवा वर्तुळाच्या परिघाची किंमत काढण्यासाठी π (पाय )ही संकल्पना वापरली जाते . π हे ग्रीक भाषेतील 24 वर्णाक्षरांपैकी बाविसावे वर्णाक्षर आहे.
वर्तुळाचे क्षेत्रफळ किंवा वर्तुळाचा परिघ काढताना गणितज्ञांना एका स्थिरांकाची गरज पडत होती आणि तो स्थिरांक त्यांना π च्या रूपाने मिळाला. खरे तर या स्थिरांकाचा वापर अगदी चार हजार वर्षांपूर्वी पासूनच होत आला आहे. अगदी भारतीय गणितज्ञांनी सुद्धा हा स्थिरांक त्याकाळी वापरलेला आढळून येतो.परंतु या स्थिरांकासाठी π हे ग्रीक भाषेतील वर्णाक्षर वापरण्याची संकल्पना सर विल्यम जोन्स यांनी इसवीसन 1706 मध्ये मांडली आणि या स्थिर अंकासाठी π हे ग्रीक वर्णाक्षर वापरण्याची मान्यता महान गणितज्ञ लिओनार्ड ऑयलर यांनी 1737 मध्ये मिळवून दिली.
काय आहे या π पायची किंमत ? ती किंमत आहे 3.14 15926 535 897 93 23 84 ...................
खरे तर ही किंमत आपण कितीही दशांश स्थळांपर्यंत सांगितली तरी ती अचूक ठरणार नाही, म्हणून तर आपण त्याची अंदाजे किंमत आपण आपल्या गणणाच्या सोयीसाठी दोन दशांश स्थळांपर्यंत पर्यंत 3.14 अशी घेतो. खरेतर π ची किंमत अपरिमेय संख्या आहे हे आपणास माहीत आहे. पण गणनाच्या सोयीसाठी ती परिमेय स्वरूपात 22/7 अशी हि घेतली जाते . अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये तारीख लिहिताना
दिनांक /महिना /वर्षअसे न लिहिता
महिना /दिनांक/ वर्ष या स्वरूपात तारीख लिहीली जाते. म्हणूनच 3.14 म्हणजेच मार्च 14 हा दिवस संपूर्ण जगभर पाय दिन म्हणून पूर्वीपासूनसाजरा केला जात होता. परंतु युनेस्कोच्या 40 व्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार 14 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय गणित दिवस म्हणून सन 2020 पासून सर्वत्र साजरा केला जाऊ लागला.
*आजच्या आंतरराष्ट्रीय गणित दिनाच्या आणि π दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!*