क्रोध हा खेदकारी
Posted on April 6, 2025
श्रीमती वर्षा गानू
उपशिक्षकमानवः न विद्युत् संचालितं यन्त्रम्
यंत्रे न भावना न विचारः ।
मनुष्यः विचारप्रेरितः तथैव
भावना वाणी संयुक्तः।।
मनुष्य म्हणजे वीजेवर चालणारे यंत्र नव्हे, यंत्राला भावना, विचार काहीही नसते. माणसांमधील सुख, दुःख, प्रेम, राग, लोभ या विविध भावना त्याला विचार करायला प्रवृत्त करतात. आपल्या मनामध्ये अनेक विचार क्षणार्धात येतात. मनात येणारे विचार विलक्षण असतात. या मनाचा ठाव घेणे खूप अवघड आहे.आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की आपल्याला पटकन राग येतो. त्या रागाने आपली पातळी अधिक तीव्र केली की त्याचे दोषामध्ये म्हणजे शत्रूमध्ये रुपांतर होते. काम, क्रोध, लोभ, मोह,मद आणि मत्सर हे षडरिपु मानले आहेत.त्यातील क्रोध म्हणजेच अति राग हा आपल्या जीवनाची राख रांगोळी करतो म्हणूनच म्हटले जाते, अति राग अन् भीक माग . वर्तमानपत्र उघडले की पोटात गोळा आणणाऱ्या बातम्या वाचायला मिळतात. तेरा वर्षीय मुलीची अनियंत्रित रागामुळे आत्महत्या, परीक्षेत कमी होऊन प्राप्त झाल्याने काही विद्यार्थी घर सोडून निघून जातात.
काही जण आपल्या आई-वडिलांच्या अंगावर धावून जातात. आपली विचार करण्याची शक्ती ते हरवून बसतात आणि अविचाराचा जन्म होतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला राग कशामुळे येतो? त्याची कारणे शोधणे गरजेचे आहे. जीवनामध्ये नकार पचविण्याची सवय हवी. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखे कधीही होत नसते. तुम्हाला एखाद्या गोष्टीची परवानगी आई-वडिलांनी का नाकारली? हे शोधा. त्यांच्याशी संवाद साधा. वाद घालण्यापेक्षा संवाद साधल्यामुळे काही गोष्टीतून आपोआप मार्ग निघतो. राग सर्वांनाच येतो ,पण त्यावर
नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. प्रयत्न करुनही खूप राग आल्यास आवडता खेळ खेळा, संगीत ऐका,योगासने ,दीर्घ श्वसन या गोष्टींकडे आपले मन वळवा. शांतपणे विचार केल्यास आपली चूक आपल्याला समजू शकते. कधी कधी आपण तास बुडवून मित्रांबरोबर चित्रपट बघायला जातो. कधी कधी आपल्या शारीरिक अस्वास्थ्यामुळे ट्रेकिंग करण्याची परवानगी आई-वडील नाकारतात, अशाप्रकारे कारणे अनेक असतात.काही वेळेला राग प्रत्यक्षपणे व्यक्त होत नसला तरी तो सतत मनात खदखदत राहतो आणि निमित्त मिळताच ज्वालामुखी सारखा उद्रेक होऊन बाहेर येतो म्हणूनच भगवद्गीतेत म्हटले आहे --
क्रोधात् भवति संमोहः संमोहात् स्मृतिभ्रंशः।
स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति ।।
अति क्रोधामुळे मनुष्याची विवेकशक्ती लोप पावते. इतकेच नव्हे तर मूढभाव उत्पन्न होऊन शेवटी मनुष्य आपला विनाश करुन घेतो म्हणून आपण सर्वांनी हानिकारक संताप हा टाळलाच पाहिजे. आपल्या रागामुळे कोणाचेही शारीरिक व मानसिक आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी जरुर घेतली पाहिजे. आपल्या जीवनाचे ध्येय शोधून आपला विकास साधला पाहिजे. काही जणांनी तर दुसरे लोक आपल्याशी रागावून बोलण्याचा फायदा देखील करुन घेतला आहे.निंदकाचे घर असावे शेजारी; या उक्तीप्रमाणे त्यांनी आपली कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करुन प्रगती साधली आहे.
काही ध्येयवादी विद्यार्थ्यांनी, तुला हा अभ्यासक्रम झेपणार नाही असे रागाच्या भरात बोलणाऱ्या गुरुजनांना आपला अभ्यासक्रम पूर्ण करुन दाखवला आहे. अशाप्रकारे रागाचा उपयोग आपल्या ध्येयपूर्तीसाठी करणारे लोक आपल्या अवतीभवती नक्कीच सापडतील, ते शोधूया. आपली प्रगती साधणारा हा राग तेव्हा नक्कीच फायदेशीर आहे; पण आपले व इतरांचे शारीरिक ,मानसिक, सामाजिक नुकसान करणारा हा राग भयानक रुप धारण करतो तेव्हा खेदकारीच आहे. म्हणून राग या भावनेवर विजय मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच करुया .