प्रवेश सुरु

माझी भ्रमणयात्रा

माझी भ्रमणयात्रा Posted on April 5, 2025

गणेश देशमुख

सहाय्यक शिक्षक

You don't always need a plan, just go. 

 

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही IAS ची प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे ते गेटवे ऑफ इंडिया राईड जाणार होती. रजिस्ट्रेशनफ्री असल्यामुळे रजिस्टर करून ठेवलं होते तसेच शाळेत देखील रजा काढून ठेवली होती. मात्र राईडला जाईलच असं काही डोक्यात नव्हतं. म्हणता म्हणता राईडचा दिवस उजाडला पण तरीही जायचं नाही असंच डोक्यात होतं. संध्याकाळ झाली शाळा सुटली आणि घरी येत असताना गाडीवर मनात अस्वस्थता निर्माण झाली. अरे यार, आता नाही गेलो तर परत पुढच्या वर्षीच संधी मिळेल. कदाचित पुढच्या वर्षी गेलो तर जाऊ किंवा नाही पण जाणार. जायला पाहिजे आपण आज ... 

अर्ध्या रस्त्यातच गाडी बाजूला घेतली आणि जे राईडला जाणार होते ,अशा संभाव्य दोघांना फोन केले एकाने फोनच उचलला नाही. दुसरा होता माझाच विद्यार्थी अभिषेक नगरकर त्याने फोन उचलला आणि तो म्हटला सर तुम्ही राईडला येणार नाहीयेत वाटतं ! कारण व्हाट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईनच दिसत नाहीत. त्याला म्हटलं माझं आता ठरतंय, मन म्हणतंययावं म्हणून , अगदी आताच तसं वाटायला लागलंय. बघू तुला अर्ध्या तासात मी कन्फर्मेशन सांगतो असं म्हणून फोन ठेवला. 

राईडच्या सूचना मेलवर आलेल्या होत्या. तो मेल ओपन केला आणि संध्याकाळी सहा वाजता ग्रुपला जॉईन झालो. राईड आजच रात्री साडेआठ वाजता निघणार होती. मुकाई चौक, रावेत इथे एकत्रीकरण आणि तिथून पुढे प्रस्थान होणार होते. म्हणजे आता माझ्याकडे फक्त एक ते दीड तास होता, कारण जायचं तर निदान 7.30 ला तरी घर सोडावं लागणार होते.तयारी तर काहीही केलेली नव्हती. 

साधारण 6.15 ला घरी पोहोचलो ,बायको अजूनही शाळेतून आली नव्हती . तोपर्यंत सायकल वगैरे पुसून घेतली. बाकीची छोटी मोठी तयारी केली. तोपर्यंत ती पोहोचली आणि मी जाणार आहेराईडला, मला लगेच जेवायला दे. विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे कुठलाही तगादा न लावता तीनं भाकरी करायला घेतली तरी मध्येच जायलाचं पाहिजे का ? असं म्हणून पण घेतलं.दिवसभर शाळेत दमलेला असल्याने थकवा जाणवतहोता.रात्रभर सायकलिंग करायचं होतं. जमेल का इतकं थकल्यावर असं क्षणभर मलाच वाटलं, पणते म्हणतात ना तुमच्या मनाने ठरवलं की शरीर बरोबर साथ देतं. शरीरापेक्षा मनावर विश्वास ठेवून निघायचं ठरवलं.अर्धा तास शांतपणे, स्वस्थ पडून राहून एक पावर न्याप घेतला. मग उठलो ,मस्त आंघोळ केली, भाकरी खाऊन राईडला बरोबर ७.१५ ला घर पण सोडलं. 

एकत्रीकरणाला अजून तास सव्वा तास होता त्यामुळे रमत- गमत रावेत बीआरटी रोड ने निघालो. घरामध्ये असताना विचार आला आज आपला मुंबई हायवेने प्रवास आहे. मागची लाईट आहेच आपल्यासोबत मात्र अजून सुरक्षितता म्हणून यार आपल्याकडेएक रिफ्लेक्टर जॅकेट हवं होत राव ! असं मनात आलं पण आता ते विकत घ्यायला ही वेळ नव्हता आणि असं कुठलं दुकान ही जवळ नव्हतं मग तसाच निघालो.गंमत सांगायची म्हणजे घरापासून चार-पाच किलोमीटर वर एके ठिकाणी रस्त्याच्या कडेला लाल रंगाचं फडकं पडलेलं दिसलं आणि पहातो तर काय चक्क ते रिफ्लेक्टर जॅकेटच होतं. मला आवडणारे आणि माझा विश्वास असलेले वाक्य पुन्हा मनात आले. "किसी चीज को पुरी शिद्दत से चाहो, तो पुरी कायनात तुम्हे उसे मिलाने से जुड जाती है." जणू काही माझी गरज ओळखूनच ते रिफ्लेक्टर जॅकेट त्या ठिकाणी कुणाकडून तरी पडलेलं होतं. कदाचित कोणीतरी रायडर किंवा एखादा कामगार तरी. युनिव्हर्सला थँक्यू देऊन त्या रिफ्लेक्टर जॅकेटचास्वीकार करून पुढे निघालो. 

रस्त्याने प्रचंड गर्दी होती. एके ठिकाणी उड्डाणपूलाच्या सुरूवातीला छोटासा अपघात होऊन तरुण मुलगा - मुलगी पडले होते आणि मुलगी चांगलीचरडत होती. सायकल थांबवली व त्यांना मदतीला थांबलो. गाडी पडल्याने त्यांच्याच एक्टिवा खाली तिचा पाय सापडला होता. पायाला सूज आलेली दिसली, त्यामुळे छोटाफ्रॅक्चर झालेला असावाहे पटकन लक्षात आले. सायकल चालवताना घंटी वाजवण्याऐवजी मी शिट्टी वापरतो. ट्रॅफिक वेगाने येत होते. एखादा महाभाग जोरात आला तर यांना उडवून पण देईल असं वाटलं.ट्राफिक मध्ये सायकल आडवी लावून शिट्टी च्या साह्याने ट्राफिक नियमन केलं.तो मुलगा उठला होता पण मुलगी काही उठेना, रडणं थांबवेना आणि त्यांच्या समजावण्याने पण ती उठेना . एकजण आला तो पण गाड्यांना बाजूने जायला सांगू लागला. 

मगमी गेलो तिच्या सोबतच्या मुलालाम्हटलं तू गाडी सांभाळ, मी तिला बसवतो .तू गाडीवर ,बस गाडी सुरू तर करसुदैवाने त्याला काही झालं नव्हतं.मग मी माझा मोर्चा तिच्याकडे वळवला, सायकल ची पाण्याची बाटली काढून तिला म्हटलंपाणी घे घोटभर, शांत पणे तिला म्हटलं, तू आता रडणं थांबव आणि पटकन गाडीवरती हिम्मत करून बस नाहीतर, पाठीमागून एखादीगाडी वेगात येईल आणि तुम्हांला धडकण्याची शक्यता आहे. चालेल का तुला? हे म्हटल्याबरोबर तिला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आलं. तिने हिम्मत जमवली धाडसाने उभी राहिली. पण तिला गाडीवर बसता येईना, म्हटलं तुला हिम्मत करावीच लागेल, वेळ घालवू नकोस आणि चमत्कार तीनं वेदना सहन करत ती पाय टाकून गाडीवर बसली देखील. त्या मुलाला तिला पटकन दवाखान्यात घेऊन जायला सांगितलं आणि ते मार्गस्थ झाले. माझ्या सोबत अजून एक जण होता जो तिथं अगोदर पासून मदत करत होता.ते गेल्यावर तो म्हटला ,गेले पाच-सहा मिनिटे आम्ही प्रयत्न करतोय पण तीहलतच नव्हती. तो मुलगा तिला धरुन उठवत होता पण तरीही ती उठली नाही,तुम्ही काय सांगितलं हो तिला? पटकन उठली, अगदी कोणाचीही मदत न घेता. मी म्हटलं तुम्ही तिचं खूप कौतुक करत होते म्हणून ती उठत नव्हती. मी फक्त तिला वस्तुस्थिती सांगितली. त्यावर तिचा पटकन विश्वास बसला आणि उठली ती. कसे असतात ना मनाचे खेळ 

मुकाई चौकात पोहोचलो मात्र नेहमीचे कोणी रायडर आलेले दिसत नव्हते. IAS ची कोर कमिटी नेहमीप्रमाणेच नियोजनात व्यस्त होती. उत्साह वाढवण्यासाठी त्यांचं काम ते करत होते. गाड्या घेऊन राईड मार्गावर सपोर्ट साठी हि मंडळी असणारच होती. ओळखीचं, समवयस्क कोणी दिसेना म्हटलं आज आपल्याला एकट्यालाच राईड करावी लागणार बहुतेक,असं वाटलं तेवढ्यात माझा विद्यार्थी अभिषेक नगरकर(2010 बॅच रमणबाग माजी विद्यार्थी)पोहोचला. त्याची भेट होते नाही कुठे तेवढ्यात एक जण समोर आला आणि म्हणाला सर नमस्ते मी अथर्व कुदळे रमणबागेचा माजी विद्यार्थी.(2019 बॅच रमणबाग माजी विद्यार्थी) दोघांना विचारलं कोण आले सोबत तुमच्या तर ते म्हणे आम्ही एकटेच आलेलो आहोत. म्हटलं ठीक आहे तर आता आपण आपलीच टीम तयार करूया. रमणबाग टीम. मला दोघांचंही कौतुक वाटलं ,आपल्याला कुठेतरी जायचं असेल तर बऱ्याच वेळा असं होतं की माणसं आधार शोधतात,सोबतशोधतात आणि असं कोणी भेटलं नाही तरी इच्छा असूनही पाहिजे त्या ठिकाणी जात नाहीत मात्र हे दोघेही एकटेच आले होते. त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक वाटलं. अशी एकट्याने कुठेही जाणारी , कोणासोबतही ॲडजस्ट करणारी माणसं खऱ्या अर्थाने जग पाहू शकतात. मस्त राहू शकतात. 

बरोबर 8.30 वाजता फ्लॅग ऑफ झाला आणि आम्ही मुंबईच्या दिशेने जुन्या हायवेने मार्गस्थ झालो. 

पहिला टप्पा पुणे-लोणावळा नेहमीच करत असल्यामुळे हा मार्ग तसा परिचयाचा आहे.यारस्त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागते .एक तर घाटावरून येणारंविरूद्ध दिशेने वाहणारं वारं आणि मध्ये मध्ये लागणारे प्रचंड चढ यामुळे हा प्रवास थोडा कस पाहणारा आहे. जुना हायवे असला तरी रस्त्याने ट्राफिक भरपूर होतं. लवकरात लवकर लोणावळा पोहोचू या बेताने सायकल दामटली, टोल नाक्याजवळ चहा पाण्याची व्यवस्था केलेली होती. चहापाणी घेतलं फ्रेश झालो पहिला टप्पा जो दमवणारा होता तो तरी छान पूर्ण झाला होता. घड्याळात रात्रीचे ११ वाजले होते. 

 

दुसरा टप्पा लोणावळा -पणवेल 

हा दुसरा टप्पा मात्र पहिल्या टप्प्याच्या अगदी विरोधी कारण लोणावळ्यापासून खाली खोपोली पर्यंत प्रचंड उतार. त्यामुळे सायकल पळवण्यापेक्षा सायकल नियंत्रणात ठेवण्याचंच जास्त कौशल्य पहाणारा. लोणावळा ते खंडाळा छान पैकीगेलो. त्यानंतर राजमाची पॉईंट वर थांबून रात्रीच्या अंधारात दिसणारा एक्सप्रेस वेचा सुंदर नजारा डोळ्यांमध्ये कैद केला. राजमाची पॉइंट चा उतार उतरलो थोडा पुढे गेल्यावर दोन जुन्या हायवे चाअत्यंत उताराचा भाग आहे. साधारणपणे सहा किलोमीटरचा हा मार्ग तीव्र उतार. त्यामुळे सायकल प्रचंड वेग पकडत असते आणि पुढचा व मागचा ब्रेक यांचं योग्य मेळ साधत वेगावर नियंत्रण ठेवत हा घाट उतरावा लागतो .जरा काही गडबड झाली तर एक तर सरळ दरीमध्ये उतरा नाहीतर, रस्त्यामध्ये जोरात आपटण्याची शक्यताच जास्त, त्यात बाजूने अंधार, भयानक वाटतो.त्यामुळे नव्याने उतरणाऱ्यांना हा एक थरारक अनुभव असतो. मागील वर्षी एकट्याने रात्री १२ वाजता हा घाट उतरायचा थरार अनुभवला होता, त्यामुळे यावर्षी फारसं नाविन्य माझ्यासाठी नव्हतं मात्र दोघाही पार्टनरना व्यवस्थित सूचना करून ठेवलेल्या होत्या. त्यांनी देखील त्या व्यवस्थित पार पाडल्या. मस्त , सुरक्षित सर्व घाट उतरून पोहचलो. एक दिव्य पार पडल्याचे समाधान मिळाले. राईड मधल्या सगळ्यांनीचखंडाळ्याचा हा एक घाट सुखरूप उतरला. कुठलीही दुखापत न होता, काहीही न होता खोपोलीत उतरलो. तेव्हा रात्रीचे १२ वाजले होते. मोठा टप्पा पार झाला होता. खोपोली ते पनवेल हा खरा थरारक अनुभव आहे. तसा सगळा रस्ता सपाट आहे मात्र संपूर्ण रस्ता भर प्रचंड अंधार .दूरपर्यंत गाव लागत नाही.त्यामुळे सुनसान रस्त्याने रात्रीच्या वेळेस सायकल चालवण्याचा थरार छान अनुभवता येतो. आम्ही तिघेच चाललो होतो. आजूबाजूची शांतता आमच्याशी छान बोलत होती. निर्मनुष्य रस्ते, आजूबाजूची झाडी, मध्येच येणारं एखादं वाहन हिच काय ती साथम्हटलं तर अतिशय रटाळ टप्पा पण आम्ही न कंटाळता इथं भन्नाट सायकल पळवली. पुढे दांड फाट्याला थोडा नाष्टा केला आणि काही वेळातच पनवेलमध्ये प्रवेश केला. पनवेलच्या बाहेर पडून कळंबोलीला पोहोचलो. रात्रीचे २.३० वाजले होते.आमचा अशा प्रकारे दुसरा टप्पा पार निर्विघ्नपणेपार पडला होता. 

 

पनवेल - मुंबई (गेट वे ऑफ इंडिया) महत्त्वाचे दोन टप्पे पार पडल्यानंतर मुंबईच्या वेशीवर आलो. राईडचा शेवटचा टप्पाहा देखील साधारण 50-60 किलोमीटर मात्र रात्रभर सायकल चालवल्यामुळे आलेला थकवा आणि दमट हवामानामुळे येणारा प्रचंड घाम यामुळे प्रचंड कस पाहणारा आहे. पनवेल ते वाशी पुलापर्यंत मध्येच येणारे उड्डाणपूल, चढ यामुळे चांगलीच दमछाक होते. मुंबईचे प्रवेशद्वार असल्यामुळे पहाट होत असताना बाहेरगावातून येणाऱ्या विविध वाहनांमुळे रहदारी देखील या ठिकाणी वाढलेली असते.मजल दरमजल करत अजून थोडं अंतर राहिले आहे अशी स्वतःचीच समजूत घालत हा टप्पा पार पाडायचा असतो. जेव्हा वाशीचा पूल ओलांडतो तेव्हा आपण मुंबईत पोहचलो हि भावना सुखावते. कधी एकदा गेटवे ला जाऊन पोहोचेल असं होऊन जातं.उरलेले अंतर आता खूपच जास्त राहिलं आहे असं वाटायला लागतं. मुंबईमध्ये प्रवेश केलेला असतो आणि नेहमीची धावती ,रहदारीने भरलेली, जिकडेतिकडे वाहनं ,लोकच असणारी ही तीच का गजबजलेली मुंबई ?असा आपल्याला प्रश्न पडतो कारण पहाटेच्या वेळी रस्त्यावरती अक्षरशः शुकशुकाट असतो.तुरळक जाणाऱ्या काही गाड्या आपल्याला दिसतात.अगदी सीएसटी ,कुलाबा ,दादर अशी अनेक ठिकाणे जिथं कायम प्रचंड वर्दळ असते. तो देखील भाग अतिशय शांत, निर्मनुष्य पाहायला मिळतो. मुंबईचं हे एक आगळवेगळे रूप ह्याच पहाटेच्या वेळेला अनुभवता येऊ शकतं. 

शेवटचे किलोमीटरआपण मोजायला सुरुवात करतो. शरीर नको म्हणत असतं पण मन त्याला समजावत असतं. थांब रे दमू नको, थोडं तर राहिलंय. अजून 20 मग 15 मग 10 असं करता करता कधी एकदा पोहोचू असं होऊन जातं. फोर्ट परिसरात आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा तिथल्या भव्यदिव , जुन्या आकर्षक ,इमारती, हुतात्मा चौक ,फ्लोरा फाउंटन ,काळा घोडा इत्यादी स्मारकेदिसायला लागतात आणि रात्रभर चालवलेल्या सायकलींगचे चीज झालं अशी भावना होऊन जाते. आपण हे आव्हान पूर्ण केलं याचा एक वेगळाच आनंद मन भरून व्यापून राहत असतो. 

रस्ता भर घामाच्या लागलेल्या अखंड धारा, धपापणारा ऊर, शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे आखडलेले स्नायू सगळं सगळं आठवायला लागतं. आपणच आपल्याशी केलेली हि एक स्पर्धाच आहे. आपणच घेतलेली आपली परीक्षा. रात्रीच्या अंधारात सायकल मारत असताना सायकलच्या रिदम सोबत स्वतःशी चाललेला संवाद आगळा वेगळा असतो. एक वेगळ्या प्रकारचे मेडिटेशन , स्वतःच अनुभवलेली काही काळाची शांतता, आनंददायी स्वसंवाद म्हणजे हा प्रवास असतो. 

गेटवे ऑफ इंडिया ला पहाटे ५.३० ला पोहोचलो. आमच्या अगोदर काही जण येऊन पोहोचले होते. काही जण येत होते समोर दिसणारा ताज, शांत असणारा समुद्र, अंधारामध्येनिर्मनुष्य असणारा गेट वे वेगळाच भासतो. सगळेजण येऊन पोहोचले तसे सगळ्यांनी एकत्रितपणे भारत मातेच्या जय-जयकार करणाऱ्या घोषणा दिल्या, राष्ट्रगीत झालं. अनेक आठवणी अनुभव, प्रवासात भेटलेली नवीन माणसं, अशा अनेक गोष्टी गाठी ला घेऊन आमची राईड संपन्न झाली. 

आठवणी या अशा आपणच तयार करायच्या विविध अनुभवांना सामोरं जाऊन. 

एक रात्र जी अशी कायम स्मरणात राहील,  

आयूष्याच्या अखेर पर्यंत,  

अनुभवसंपन्न करणारी.