पाठ्यपुस्तकातील महिला
Posted on March 24, 2025
सौ.चारुता शरद प्रभुदेसाई
मुख्याध्यापकआंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सगळीकडे महिला दिनाचा उत्साह आणि उहापोह चालू असताना शिक्षण क्षेत्राशी निगडित पाठ्यपुस्तकांमध्ये महिलाना असलेले महत्त्व याबद्दल काही लिहावेसे वाटले.
याबद्दल विचार करताना दोन पैलू समोर ठेवून माहिती गोळा केली.ते म्हणजे पाठ्यपुस्तकातील लेखिका व कवयित्री म्हणून महिलांचे स्थान आणि महत्त्व तसेच कर्तृत्ववान महिलांबद्दल पाठ्यपुस्तकांमध्ये किती लिहिले गेले आणि त्यांच्या कार्याची ओळख असे दोन अंगानी मांडावेसे वाटते.
यासाठी इयत्ता ५ वी ते १० वी ची ssc बोर्ड अभ्यासक्रमाची बालभारती ने तयार केलेली सध्या चालू असलेली मराठीची पाठ्यपुस्तके निवडली.मराठी प्रथम भाषा स्तरावर अभ्यासली जाणारी ही पुस्तके आहेत.प्रथम भाषा हा स्तर असल्याने याची उद्दिष्टे तशीच ठरवलेली असतात.यात संत साहित्यापासून सुरुवात करून अगदी अर्वाचीन साहित्यापर्यंत समावेश केलेले स्त्री साहित्य उपलब्ध आहे.इयत्ता ५ वीच्या पुस्तकात संत जनाबाई,७ वीच्या पुस्तकात संत कान्होपात्रा यांचे अभंग तत्कालीन समाजाचे प्रतिनिधित्व करतात.विठ्ठल भक्तीची ओढ दाखविणारे साधे सोपे शब्द या अभंगांमध्ये आहेत.त्यावेळी आणि स्वातंत्र्य पूर्व काळापर्यंत स्त्रिया घर,संसार,यात आपले चातुर्य पणाला लावत असत.त्यांच्या हुशारीला म्हणावं तसा वाव मिळत नव्हता.पण त्या घर,शेती,सांभाळत असत.बहिणाबाई चौधरी या लौकिक अर्थाने अशिक्षित कवयित्रीने वेचक वेधक असे जे जीवन काव्य लिहिले ते ५ वीच्या पुस्तकात समाविष्ट आहे.रोजच्या जगण्यात येणारे अनुभव,समस्या,त्यावरील उपाय आणि जीवनाकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी विद्यार्थ्यांना आत्तापासून कळावी यासाठी बहिणाबाईंचे काव्य मोलाचे आहे.अशाच एक अभ्यासू आणि ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या सरोजिनी बाबर यांचे सण उत्सव,लोकसंस्कृती चे दर्शन घडवणारे लेखन मनाला स्पर्श करते.' कारागिरी ' हा त्यांनी लिहिलेला पाठ म्हणजे बारा बलुतेदारांची ओळख आहे.
' माझं शाळेचं नक्की झालं ' या पाठात विमल मोरे यांनी आपल्या शाळा प्रवेशाची सुरस कहाणी सांगितली आहे.संवेदनशील कवयित्री इंदिरा संत यांची गाजलेली ' गवत फुला रे गवत फुला ' ही सोपी, छंदबद्ध,संवेदनशील कविता मुलांना निसर्गाच्या जवळ नेते.याबरोबर संजीवनी मराठे,इरावती कर्वे, पद्मा गोळे, विनोदी आणि उपरोधिक शैलीत लिहिणाऱ्या मंगला गोडबोले, विजया वाड , मराठी भाषेच्या गमती जमती लिहिणाऱ्या निलिमा गुंडी ,प्रेरक लिहिणाऱ्या आसावरी काकडे, ललित लेखन करणाऱ्या अरुणा ढेरे,सुधा मूर्ती,मीरा शिंदे, माधुरी शानभाग,सुनंदा भावसार,दीपा देशमुख, शारदा दराडे,मृणालिनी कानिटकर,प्रतिभा पानट अशा जुन्या नव्या लेखिका व कवयित्रीनी लिहिलेले लेखन या पुस्तकांमधे समाविष्ट आहे.बालसाहित्यिक व कवयित्री असणाऱ्या पद्मिनी बिनीवाले,प्रियंवदा करंडे, गिरिजा कीर,यांचे साहित्य त्या त्या वयोगटाला साजेसे आहे. इयत्ता दहावीच्या पाठ्यपुस्तकात विदुषी,व्यासंगी लेखिका दुर्गा भागवत यांचा वसंत हृदय चैत्र हा पाठ बारीक निरीक्षण शक्ती व निसर्गातील सूक्ष्म बदल दाखविणारा पाठ आहे.
आता ज्या कर्तृत्ववान स्त्रियांबद्दल पाठ्यपुस्तकात परिचयात्मक लिहिले गेले त्यात लेफ्टनंट व वीर पत्नी स्वाती महाडिक, भरकटलेल्या मुलांना योग्य मार्गावर आणणाऱ्या सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी केलेले बहुमोल कार्य, दिव्यांग असून माउंट एव्हरेस्ट पार केलेली व खुप मोठ्या जिवावरच्या संकटाला तोंड द्यावे लागलेली अरुणिमा सिन्हा,तसेच मेट्रो चालविणाऱ्या पहिल्या महिला सारथी रूपाली चव्हाण, ऑलिम्पिक खेळाडू पीव्ही सिंधू, तसेच सात मच्छीमारांना वाचवलेल्या धाडसी कॅप्टन राधिका मेनन यांच्या शौर्याचा परिचय या पाठ्यपुस्तकांमध्ये करून दिला आहे.महिलांचे समाजकार्यातील व वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्रातील योगदान अधोरेखित करणारे हे पाठ प्रेरक आहेत.
इयत्ता दहावीच्या आंतरभारती या पुस्तक मालिकेत मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात मी स्वतः लिहिलेल्या' तू सर्व जगाचा त्राता रे ' या प्रार्थनेचा समावेश आहे याचा मला स्वतःला खूप अभिमान आणि समाधान वाटते.बालभारती सारख्या प्रसिद्ध पाठ्यपुस्तक मालिकेत स्थान मिळणे हे सर्वच साहित्यिकांसाठी मानाचे पान असते.त्यात महिलाना ही संधी मिळणे ही गौरवाची बाब! महिला दिनानिमित्त इथे महिलांचा लेखन ,वाचन,समाजशिक्षण,या क्षेत्रातील हा मुक्त वावर आपले महाराष्ट्र राज्य किती पुरोगामी आहे याचे द्योतक आहे. आज महिलांना अनेक क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत आणि त्याचा योग्य वापर करून त्या संधीचे सोने करणाऱ्या या सर्व स्त्रीशक्तीला सलाम!पाठ्यपुस्तकातील महिला,त्यांचे योगदान,त्यांचे कर्तृत्व याबद्दल अगदी धावता आढावा घेऊन काही पैलू मला उलगडून दाखवता आले याचा आनंद होतो आहे.
मीच सृजन मी प्रतिभा
मी निर्मिती मी आभा!
मी चतुरा मी विदुषी
संवादिनी मधुभाषी!
अशा या महिलांनी लिहिलेले व महिलांच्या कार्याबद्दल लिहिलेले हे सर्व लेखन विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आहे हे नक्की !