प्रवेश सुरु

शालेय रंगभूमी आणि नाटक

शालेय रंगभूमी आणि नाटक Posted on April 4, 2025

रवींद्र सातपुते

सहाय्यक शिक्षक

शालेय रंगभूमी आणि नाटक 

नाटक हे प्रत्येकाच्या आयुष्यात असते. नाटकाला आपण आयुष्यातून बाजूला सारू शकत नाही. आपण सहज म्हणून जातो, “ काय रे नाटक करतोस ? ” , “ अरे, किती नाटकी आहेस तू.” “ बास झालं हा तुझं नाटक!” खरंतर प्रत्येकाच्या आयुष्यात नाट्यमय घटना घडत असतात त्यांचेच प्रतीबिंब नाटकात उमटत असते. नाटक मूळातच प्रत्येकाला आवडणारी गोष्ट आहे. लहान मुलांना तर नाट्यमय गोष्टी खूप आवडतात. मुलांना गोष्ट ऐकायला आवडते त्यापेक्षा बघायला खूप आवडते. शाळांमध्ये नाटक सादर करताना बरेच शिक्षक दिलेलं स्क्रिप्ट पाठ करून विद्यार्थ्यांना उभे करण्याचा प्रयत्न करतात. खरंतर ते पात्र कोण आहे? त्याचं वय किती आहे? त्याचं शिक्षण किती झालंय? ते कुठे राहते? त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे? त्याचा स्वभाव कसा आहे ? या सर्वावर त्या पात्राचं व्यक्त होणे अवलंबून असतं. कला ही अशी गोष्ट आहे की जिथे मुलांना त्यांच्या विचारांना, कल्पनांना, त्यांच्या व्यक्त होण्याला संधी देणे महत्वाचे असते. हस्तकलेच्या तासाला वर्गात भरपूर कागद दिले आणि त्यांना सांगितले की आता याच्यापासून तुम्हाला पाहिजे ते बनवा. यात त्या मुलांना खूप आनंद मिळतो. मुलांना ते करत असलेल्या कामात स्वातंत्र्य मिळणे महत्त्वाचे असते. शाळांमध्ये नाट्य विषय शिकवताना अथवा नाटक बसवताना या गोष्टीची काळजी घेतली जावी. मुलांना रंगमंचीय खेळातून नाटकाची ओळख करून देत त्यांच्या भाव ,भावना याद्वारे विकसित करणे गरजेचे आहे. 

उदा. १) तुम्ही प्राणी आहात, तुमच्यातल्या एखादा छोटा प्राणी कुठेतरी एखाद्या संकटातून अडकला आहे, तुम्ही त्याला मदत करता . 

२) तुम्ही पक्षी आहात तुम्ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात आहात . पडलेले दाणे दिसतात .ते टिपणार ठेवायचे तेवढ्यात कुणीतरी तुमच्यावर जाळ टाकते. तुम्ही अडकले आहात आणि तुम्हाला त्यातून बाहेर पडायचे आहे. 

३)तुम्ही डोंगरावर गेला आहात. हिरव्यागार गवतातून फिरता फिरता पाय घसरून पडता. तुमच्या पायाला लागलय, पायाला वेदना होत आहेत आणि त्या क्षणी एक सुंदर फुलपाखरू एका फुलझाडावर तुम्हाला दिसते. दुःख विसरून तुम्ही त्या फुलपाखराकडे बघत राहतात. त्याच्या जवळ जात त्याला अलगद पकडण्याचा प्रयत्न करता पण तेवढ्यात ते उडून जाते. 

 ४) तुम्ही अभ्यास करत बसला आहात . तेवढ्यात शेजारीच्या घरातून मॅचचा आवाज येतोय. आईने अभ्यास करायला लावलाय. पण मॅचमुळे तुमचं लक्ष लागत नाही. अभ्यास आणि मॅच ही द्विधा मनस्थिती तुम्हाला दाखवायची आहे. 

असे कितीतरी प्रसंग नाट्यमयरीत्या करून घेऊ शकता. नाटक हे केवळ दिग्दर्शकाचे, शिक्षकांचे असू नये ते सर्व विद्यार्थ्यांचे असावे. त्या नाटकात घडणारी प्रत्येक घटना, प्रत्येक मुलाला माहीत असली पाहिजे. प्रत्येक शब्द , प्रत्येक संवाद सर्वांना माहीत असायला हवेत. नाटकाची पार्श्वभूमी, त्यातील प्रसगांचे वर्णन करून सांगणं आणि मग त्याला सोबतीला शब्दांची जोड देणं हे फार महत्त्वाचे आहे. मुलांना त्यांच्या सादरीकरणाला स्वातंत्र्य मिळालं नाही तर ती केवळ कळसुत्री बाहुल्यांसारखी वावरताना दिसतात. त्यांच्या सादरीकरणात दिग्दर्शक डोकावायला लागतो. केवळ पोपटपंची करून उभी राहिलेली कृत्रिम पात्र दिसू लागतात. मुलांशी गप्पा मारता मारता त्या नाटकाच्या आधीची गोष्ट काय असावी ? किंवा त्या नाटकांनंतरची गोष्ट काय असेल ? याचा विचार त्यांना करायला लावावा. मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते . या उर्जेला आपण योग्य दिशेला वळवलं पाहिजे. खरंतर अशा छोट्या छोट्या प्रसंगांमधून मुलांमध्ये मूल्यशिक्षण, संघ भावना, सहकार्य,आपुलकी , प्रेम , संवेदनशीलता अशा अनेक गोष्टी निर्माण करता येऊ शकतात. म्हणून शाळेत नाटक हा एक महत्त्वाचा विषय म्हणून शिकवण्याची गरज आहे. 

आता अनेक शाळांतून नाटक विषय शिकवला जात आहे ही चांगली बाब आहे. आमच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेमध्ये आमचे मुख्याध्यापक श्री. सुनील शिवले सर यांच्या संकल्पनेतून नाट्य छंद हा विषय इयत्ता सहावी साठी सुरू केला आहे . आठवड्यातल्या दोन तासिका या विद्यार्थ्यांसाठी दिल्या जातात ही मुलं रंगमंचीय खेळ 

खेळत नाटकाची ओळख करून घेत आहेत.सध्याच्या मुख्याध्यापिका श्रीम. चारुता प्रभुदेसाई मॅडम यांनी त्याला प्रोत्साहन दिले आहे. 

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आले आहे. यामध्ये आता कौशल्य विकास आधारित अभ्यासक्रमावर भर दिला गेला आहे .यामध्ये अशा प्रकारच्या विविध कौशल्याधिष्टीत अभ्यासक्रमांना आता महत्त्व येणार आहे. ही नक्कीच जमेची बाजू असणार आहे.